Monday 23 August 2021

महाराष्ट्राची लोककला 2020

महाराष्ट्रातील लोककला


Our folk art !! | Yin Buzz

महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. ग्रामीण भागातून आजही विविध समाजगट ही संपन्नता जोपासत आहेत. समाजाच्या विविध गटांतून तयार झालेली गीते, नाचाचे प्रकार, कविता, संकल्पना यांचा समावेश लोककलांमध्ये होतो. लोकरंगभूमी विकसित झाली .
कीर्तन ,दशावतार तसेच गावांमधून होणाऱ्या जत्रा -उत्सवामधून होणारे वगनाट्य, तमाशा, लोकनाट्य, विधीनाट्य ,बहुरूपी , डोंबाऱ्याचे खेळ,पोवाडा, गोंधळ ,जागरण, कलगीतुरा, लळीत ,बहुरूपे ,कुडमुडे जोशी, वासुदेव, यात लोककलांमध्ये रंगभूमीची बीजे दिसतात.

लोककलेत पुढील प्रकारांचा समावेश होतो

दशावतार

हिंदू धर्मात विष्णू देवाला सृष्टीपालन करणारा मानले गेले आहे. धर्माच्या रक्षणासाठी हिंदू धर्मग्रंथ भागवतपुराणानुसार सतयुग ते कलीयुगापर्यंत विष्णूने २४ अवतार घेतले आहेत. त्यामधील दहा प्रमुख अवतार 'दशावतार' स्वरुपात प्रसिध्द आहेत.

लावणी


लावणी हा महाराष्ट्रातील कलाप्रकार आहे. लावणी कित्येकदा तमाशाचा हिस्सा म्हणूनही सादर करतात. लवण म्हणजे सुंदर. लवण या शब्दावरून लावण्यगीत वा लावणी शब्द तयार झाला आहे.[१] लावणी हा कलाप्रकार शृंगार,वीरता व भक्ती या रसांचा परिपोष करण्यासाठी पूरक माध्यम समजले जाते. 'लास्य' रसाचे दर्शन घडविणारी लावणी हा महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार आहे. लास्य रस म्हणजेच शृंगाराचा परिपोष असणारा रस. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम.
   भारतात विविध ठिकाणी विविध नृत्यशैली अस्तित्वात आहेत. लावणी हे नृत्यप्रकार मूख्यतः महाराष्ट्र या राज्यात सर्व ठिकाणी सादर केले जाते.
पॅरिसच्या आयफेल टॉवर समोर भारत महोत्सवात नृत्य समशेर माया जाधव यांनी लावणी सादर केली. त्यामुळे लावणीला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झाली. 'सुंदरा मनामध्ये भरली' हा लावणीवर आधारित कार्यक्रम अमेरिकास्थित मराठी कलावंत डॉ. मीना नेरुरकर यांनी सादर केला. त्यामुळे लावणीकडे अभिजनवर्ग वळला हे जरी खरे असले तरी गावोगावच्या जत्रांमधून, उत्सवांमधून लावणी पिढ्यान् पिढ्या जनसामान्यांचे रंजन करीत असल्याचे अनुभवाला येते
'लावणी'च्या उत्पत्ती विषयी दोन स्वतंत्र विचारप्रवाह आहेत. लावणीचे मूळ संतांच्या विराण्या, गौळणी, बाळक्रीडेचे अभंग यात दिसते. संतांचे संस्कार घेऊन तंतांनी म्हणजे शाहिरांनी ज्या विविध रसांच्या रचना केल्या त्यात लावणीचा समावेश होता.महाराष्टातील संतांचे संस्कार हे तंतांवर होते. बाराव्या, तेराव्या शतकात महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात जी आध्यात्मिक क्रांती झाली त्या क्रांतीपर्वात अनेक संत उदयाला आले ते भिन्न जातीपातीचे होते. पश्चिम बंगालचे चैतन्य महाप्रभू, कर्नाटकचे पुरंदरदास, संत मीराबाईतुलसीदास, महाराष्ट्रातून संत ज्ञानेश्वरांपासून नामदेवतुकाराम,रामदास,एकनाथगोरोबासावताचोखाकान्होपात्रानरहरी अशी अनेक संत मंडळी विविध सामाजिक स्तरातील होती. संतांचा हा कार्यकाळ थेट १७ व्या शतकापर्यंतचा मानला जातो. त्यानंतर १९ व्या शतकापासून तंतांचा म्हणजेच शाहिरांचा उदय झाला. ज्यात प्रभाकर, रामजोशी, सगनभाऊ, हैबती, अनंत फंदी आदींचा समावेश होता. या शाहिरांनी अनेक गण, लावण्या रचल्या. त्या सर्वच लावण्या शृंगारिक होत्या, असे नव्हे तर भक्तीरसप्रधान, वीररसयुक्त, वात्सल्यरसप्रधानही होत्या. विसाव्या शतकात पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, अर्जुना वाघोलीकर, हरि वडगावकर, दगडू बाबा साळी, कवी बशीर मोमीन कवठेकर आदी कलावंतांनी गण, गौळणी, लावण्या, कथागीते रचली. या कथागीतांचीच पुढे वगनाट्ये झाली. ज्येष्ठ लावणी कवी बशीर मोमीन कवठेकर यांनी तब्बल ५० वर्षे तमाशा सृष्टीला आपल्या लेखणीतून विविध प्रकारचे मनोरंजनात्मक साहित्य पुरवले. लावणी, गण, गवळण, पोवाडे, सवाल जवाब आणि वगनाट्य अशा सर्व प्रकारच्या लेखांतून त्यांनी भरीव असे योगदान दिले आहे. महाराष्ट्र सरकारने मोमीन कवठेकर यांना २०१७ सालच्या "तमाशासम्रादणी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराने" सन्मानित केले आहे. 'भृंगावर्ती गेय रचना' म्हणजे लावणी. 'लावणी' म्हणजे चौकाचौकांचे पदबंध लावत जाणे. कृषिप्रधान संस्कृतीत श्रमपरिहारासाठी जी गीते गायली जातात त्यांची जातकुळी लावणीसारखीच असते. लावणी शब्दाचे साधर्म्य कृषी संस्कृतीतील पेरणी, लावणीशी देखील जोडली जाते. संत साहित्यानंतरचा काळ हा लावणीचा उदयकाळ मानला जातो.
लावणीचे मुख्यत: तीन प्रकार आहेत.
  • नृत्यप्रधान लावणी
  • गानप्रधान लावणी
  • अदाकारीप्रधान लावणी
प्रारंभकाळात लावणी गेय स्वरूपात ज्ञात होती. नृत्यप्रधान लावणी हे अगदी अलीकडच्या काळातील रूप होय. जुन्नरी, हौद्याची, बालेघाटी, छकुड, पंढरपुरीबाजाची अशी लावणीची विविध रूपे होत. जुन्नरी आणि हौद्याची लावणी प्रामुख्याने ढोलकी फडाच्या तमाशात सादर होते. बालेघाटी लावणी ही रागदारी थाटाची विलंबित लयीतील लावणी होय. संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी पंढरपुरी बाजाच्या लावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. 'छक्कड' म्हणजे द्रुतलयीतील, उडत्या चालीची लावणी. यमुनाबाई वाईकर यांनादेखील लावणीतील विशेष योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी बालेघाटी लावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.
  • मधुचंद्राचा अनुभव घेणाऱ्या बालिका वधूच्या भावस्थितीचे दर्शन घडविणारी लावणी सत्यभामाबाई पंढरपूरकर सादर करीत तेंव्हा घाबरलेल्या बालिका वधूच्या दहा भावमुद्रांचे दर्शन त्या घडवीत. अंगाला कंप सुटणे, ओठ कोरडे पडणे, डोळ्यातून अश्रू येणे, गाल लाल होणे आदी मुद्रा सत्यभामाबाई करून दाखवीत. पंढरपूरच्या मंदिरात लावणी सम्राट बाळकोबा उत्पात यांच्यासमोर ही लावणी सादर करताना दहावी अदा कोणती असा सवाल त्यांनी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांना करताच त्यांनी जवळच्या खांबाला मिठी मारून डोळे गच्च बंद केले व ही 'दहावी अदा' असे सांगितले असे त्यांचे वैशिष्ट्य सांगितले जाते.
  • यमुनाबाई वाईकरांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथ्थक नर्तक बिरजू महाराज यांच्या सोबत लावणीची अदाकारी केली होती. 'तुम्ही माझे सावकार' ही विलंबित लयीतील लावणी त्या अदाकारीसह सादर करीत असत.
  • 'पंचकल्याणी घोडा अबलख' ही नृत्यप्रधान लावणी अथवा 'पंचबाई मुसाफिर अलबेला' ही नृत्यप्रधान लावणी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, मधु कांबीकर, राजश्री नगरकर, छाया खुटेगावकर यांनी खूपच लोकप्रिय केली होती.
घुंगरांच्या बोलांचा आवाज, घोड्याच्या टापांसारखा काढण्याचे कसब या लावणी सम्राज्ञींनी आत्मसात केले होते. नृत्य, अदाकारी आणि गायन असा त्रिवेणी संगम घडविणाऱ्या लावण्या, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकरसुरेखा पुणेकर सादर करीत असत.
  • 'पाहुनिया चंद्रवदन मला साहेना मदन' ही अदाकारीची लावणी गुलाबबाई संगमनेरकर यांनी लोकप्रिय केली आहे
अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी महोत्सवातून तसेच शासनाच्या लावणी महोत्सवातून अलीकडच्या काळात ज्या लावणी नर्तिका प्रसिद्धीच्या झोतात आल्या त्यात राजश्री नगरकर, आरती नगरकर, छाया खुटेगावकर, माया खुटेगावकर, वैशाली परभणीकर, रेश्मा-वर्षा परितेकर आदींचा उल्लेख करवा लागेल.
आशुक माशुक नार नाशिकची
गोदे तटी रामाच्या घाटी चांदीची लोटी
बसले घाशीत
हशी खुशीने पदर सावरी ग
भिजे लुगडे वरती आवरी ग
हळदी कुंकवाचा डाव्या हाती डबा डबा
उडे चालताना बाईचा झुबा झुबा
पुढे रस्त्यात मैतर उभा उभा

लेझीम


लेझीम हे महाराष्ट्रातील एक लोकनृत्य आहे. या नृत्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू:
  1. लेझीम - अंदाजे एक ते दीड इंच व्यासाच्या लाकडाच्या दांडीच्या दोन्ही तोंडांना एक साखळी बांधलेली असते. साखळीच्या कड्यांमध्ये लोखंडाच्या चिपळ्या अडकवलेल्या असतात. साखळीच्या मधोमध लेझीम पकडण्यासाठी जागा ठेवलेली असते. ही साखळी ओढली असता चिपळ्या एकमेकांवर आपटून आवाज येतो.
  2. हलगी - एक चर्मवाद्य
  3. ढोल - एक अरुंद ढोल.
  4. झांज - टाळासारखे पण मोठ्या आकाराचे आणि पसरट तोंड असणारे वाद्य

पोवाडा

पोवाडा हा वीर रसांतील लेखनाचा आणि गायनाचा महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रकार आहे. पोवाड्याचा शब्दश: अर्थ उच्चरवातला संवाद ( संस्कृत प्र + वद ==> पवद ==> पवड ==> पवाडा ==> पोवाडा) असा होतो. वीरांच्या पराक्रमांचे, विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे तसेच एखाद्याच्या सामर्थ्य, गुण, कौशल्ये इ. गुणांचे काव्यात्मक वर्णन प्रशस्ती किंवा स्तुतीस्तोत्र म्हणजे पोवाडा, असा पोवाडा शब्दाचा अर्थ महाराष्ट्र शब्दकोशात दिला आहे .
पोवाड्याचा उल्लेख ज्ञानेश्वरी मध्ये "पवद" असा केलेला आढळतो. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांवर केलेले पोवाडे विशेष प्रसिद्ध आहेत.
मराठी भाषिकांचा हा एक स्फूर्ति देणारा गीत प्रकार आहे. भारतात याचा उदय साधारण १७ व्या शतकात झाला. पोवाड्यात ऐतिहासिक घटना समोर ठेवून गीत रचना केली जाते आणि खास वेगळ्या अशा धाटणीने मनोरंजक पद्धतीने गायली जाते. पोवाड्याची गीते रचणाऱ्या आणि गाणाऱ्या लोक कलावंतांना शाहीर म्हणतात.
इ.स. १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी राजे यांनी अफझलखानाचा वध केला. त्या प्रसंगावर अग्निदास यांनी एक पोवाडा रचून तो गायला होता. कवी तुलसीदास यांनी सिंहगड सर करणाऱ्या तानाजीवर पोवाडा केला होता, तर यमाजी भास्कर यांचा बाजी पासलकरवर पोवाडा आहे.
महाराष्ट्रामधील पेशव्यांच्या कारकिर्दीत राम जोशी (१७६२-१८१२) अनंत फंदी (१७४४-१८१९) होनाजी बाळा (१७५४-१८४४) प्रभाकर (१७६९-१८४३) वगैरेंनी अनेक पोवाड्यांची रचना केली.[१]
हॅरी अरबुथनोट अक्वोर्थ आणि एस.टी. शालिग्राम यांनी साधारण ६० पोवाडे मिळविले आणि ‘इतिहास प्रसिद्ध पुरूषांचे व स्त्रियांचे पोवाडे’ हे पुस्तक लिहून सन १८९१मध्ये प्रसिद्ध केले.[२] यापैकी १० पोवाड्यांचे एच. ए. अक्वोर्थ यांनी १८९४ मध्ये इंग्लिश भाषेत भाषांतर केले आणि ते ‘बॅलाड्स ऑफ द मराठा’ (मराठी पोवाडे) नावाने प्रसिद्ध केले.
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय (२००९)या मराठी सिनेमा मध्ये अफझलखानाचा वध हा पोवाडा गायला आहे.[३]
महात्मा जोतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी राजांची समाधी शोधून काढली आणि सन १८६९ मध्ये पुणे येथे शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. त्यांनी त्या समाधीची दुरूस्ती केली आणि त्यांनी त्यांचे ‘बल्लड(पोवाडा) ऑन शिवाजी’ हे पहिले पुस्तक लिहिले.[४]
महानुभाव संप्रदायातले भानुकवी जामोदेकर (जन्म : नांदेड जिल्हा, इ.स. १९२३) यांनी स्वातंत्र्याचा पोवाडा, रझाकाराचा पोवाडा वगैरे पोवाडे लिहिले होते. त्यांनी काही काळ शाहिरीचे व कलगीतुऱ्याचे अनेक प्रयोग केले.
शाहीर पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर यांचे 'वीराग्रणी मुरारबाजी देशपांडे अर्थात्‌ पुरंदरचा वेढा', 'शाहिस्तेखानाचा पराभव' हे पोवाडे यथे आहेत
१. पुण्यातली शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी ही पोवाड्यांचे वर्ग घेते. पिंपरी चिंचवडमध्येही पोवाडा शिक्षणाचे वर्ग सातत्याने चालतात.
२)" शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच " ही संस्था महाराष्ट्रात विविध ठिकाणी शाहिरीच्या संगोपन,संवर्धन,आणि प्रशिक्षणाच्या अनुषंगाने काम करुन तरुण व होतकरूंना शाहिरी व लोकतालवाद्यांचे शास्त्रोक्त शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. सेवानिवृत्त दारूबंदी सहाय्यक आयुक्त - समाज कल्याण, महाराष्ट्र शासन या पदावर काम केलेले राज्यशासनाचा राज्यसांस्कृतीक पुरस्कार प्राप्त *ज्येष्ठ शाहीर अंबादास तावरे* यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली " *शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच "* या संस्थेची सुरवात केली , पुढल्या वर्षी या संस्थेला १० वर्ष होत आहेत . या संस्थेने १० वर्षात केलेल्या कामाचा आढावा आपणांस पाठवीत आहे .
*शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच , औरंगाबाद .* 
   " शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच " ही संस्था गेल्या  १० वर्षापासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी शाहिरीच्या संगोपन, संवर्धन, आणि प्रशिक्षणाच्या अनुषंगाने काम करुन तरुण व होतकरूंना शाहिरी व लोकतालवाद्यांचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. ह्यामुळे उदयोन्मुख शाहीर, वादक, कवी व कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमात, स्पर्धेत या मंडळींनी वाहवा मिळविली आहे,तसेच अनेक कलावंत व्यावसायिक कसोटीला पात्र ठरले असून शाहिरी व लोककलेची पताका उंचावत आहे.
      शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंचाने आत्तापर्यंत *शाहिरी प्रशिक्षण शिबीर* , *शाहीरमहर्षी आत्माराम पाटील बालशाहीर पुरस्कार* 
1) युवाशाहीर रामानंद उगले जालना. प्रथम बाल शाहीर पुरस्कार प्राप्त. २) युवा शाहीर पृथ्वीराज माळी सांगली. व इतर.आघाडीचे शाहीर व *महिला शाहीर पुरस्कार*,शाहिरी गायन स्पर्धा , शाहिरी पोवाडे व गीतलेखन स्पर्धा , शाहिरी पुस्तक प्रकाशन,ढोलकी प्रशिक्षण शिबीर , लोककलावंत मेळावे ,महिलांसाठी शाहिरी प्रशिक्षण शिबीर, शाहिरी सन्मान सोहळे आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे .
    आणि याच सोबत 'लोकरंग', 'अक्षरधारा' ,'रात्र शाहिरांची', 'रंग शाहिरीचे',' जागर आत्मशाहिरीचा',*आत्मरंग* अशा या माध्यमातून शाहिरीचे व लोककलेचे असणारे रंग महाराष्ट्रात उधळले आहे .
आत्तापर्यंत मंचाने आठ बालशाहीर पुरस्कार प्रदान केले आहेत, याचे स्वरूप ५०००/- रु. रोख , स्मृतिचिन्ह, मानाचा फेटा, श्रीफळ असे आहे . यामुळे बालशाहीरांना खूप प्रोत्साहन मिळाले असून यामुळे हे पुरस्कार प्राप्त बालशाहीर आज व्यावसायिक तसेच टीव्ही चॅनेल सारख्या कसोटीस पात्र ठरले आहे .
त्याचसोबत मंचातर्फे झालेले पुस्तक प्रकाशन - १) *मराठवाड्याची शाहिरी*
( मराठवाड्यातील ५० शाहिरांचा परिचय पुस्तक )
२) *शाहिरी ललकार*
( मंचातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शाहिरी पोवाडे व गीतलेखन स्पर्धेतील निवडक पोवाडे व गीत यांचे पुस्तक )
३) *शाहीर अज्ञानदास*
 (आद्यशाहीर अज्ञानदास यांच्या माहितीचे पुस्तक )
४) *लोकरंग*
 (ज्येष्ठ शाहीर अंबादास तावरे यांच्या पोवाडे व कवणाचे पुस्तक)
 हे साहित्य उपलब्ध आहे .
यासोबत शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच व लोककला प्रशिक्षण वर्ग - गरवारे कम्युनिटी सेंटर, गरवारे बालभवन , औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने
  • लोकशाहीर आपल्या भेटीला...* ही मालिका सुरू केली असून यामध्ये लोककलावंतांची मुलाखत व सादरीकरण बघायला मिळणार आहे . हे मालिका पर्व लोककला प्रेमी, लोककला अभ्यासक, लोककला शिकू इच्छिणारे विद्यार्थी तसेच लोककलेतील विविध विषयांवर PHD साठी विषय मांडणाऱ्या लोकांसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचे आपल्या लोककलावंतासाठी Documentry व पुढच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचा साठा असून हे मालिका पर्व you tube चॅनेल वर बघायला मिळणार आहे .
तरी असे हे शाहिरीचे व लोककलेचे कार्य मंचातर्फे चालू आहे .
"शाहीर बाबूसिंह राजपूत कलामंच" ही बुलढाणा जिल्ह्यातील संस्था नवतरुणांना शाहिरी पोवाडे व गीतांचे प्रशिक्षण देते. कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून शाहिरी बाबूसिंह राजपूत यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी कार्यक्रम होतात.
  • ऐतिहासिक पोवाडे (य.न. केळकर)
  • काव्यगंगा व पोवाडा-राष्ट्रचैतन्य गीत (डाॅ. गंगाधर बापू रासगे)
  • पोवाडा कसा म्हणावा (शाहीर विजय जगताप)
  • पोवाडे (सीमा महाबळ)
  • पोवाडे कर्तृत्वाचे (शाहीर : नानासाहेब रामराव दळवे)
  • पोवाडे नव्या युगाचे (प्रभाकर जामखेडकर)
  • तमाशा

  • तमाशा हा गायन, वादन, नृत्य आणि विनोद यांनी युक्त असलेला लोकनाट्याचा एक आविष्कार आहे. तमाशा हा शब्द मूळ अरबी असून, त्याचा अर्थ दृश्य, खेळ वा नाट्यप्रयोग असा आहे. तमाशाचे खेळ(प्रयोग) गावोगाव भरणाऱ्या जत्रांत, उघड्यावर किंवा तंबूंत होत असतात. त्यामुळे प्रयोगाला फारसे नेपथ्य लागत नाही. तमाशात काम करणारी पुरुषपात्रे नेहमीच्याच वेशात असतात, तर स्त्रीपात्रांची वेशभूषा शक्य तितकी आकर्षक व उद्दीपक असते. तमाशातले गायक. वादक, सुरत्ये(सुरत्या= गायनात सूर देऊन साथ करणारा) व नर्तकी सदैव मंचावरच असतात. या मंचाला तमाशाच्या भाषेत ’बोर्ड’ म्हटले जाते. गायनाला ढोलकी, कडे, झांज, बाजाची पेटी आणि ट्रॅंगल यांची साथ असते. तमाशाच्या एका खेळामध्ये गण-गौळण, बतावणी, फार्स, रंगबाजी आणि वग असे पाच प्रकारचे नाट्य असते.
    ज्येष्ठ साहित्यिक बशीर मोमीन कवठेकर यांनी तब्बल ५० वर्षे तमाशा सृष्टीला आपल्या लेखणीतून विविध प्रकारचे मनोरंजनात्मक आणि समाजोपयोगी साहित्य पुरवले. लावणी, गण, गवळण, पोवाडे, सवाल जवाब आणि वगनाट्य अशा सर्व प्रकारच्या लेखांतून त्यांनी भरीव असे योगदान दिले. महाराष्ट्र सरकारने त्यांना २०१८ सालच्या "तमाशासम्रादनी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.
    • मराठवाड्यातील लोककला आणि लोकनाट्याची परंपरा:-*
    मराठवाड्याला लोककला आणि लोकनाट्याची समृद्ध परंपरा आहे.कीर्तन, भजन, भारुड, वासुदेव, जागरण, गोंधळ, बहुरूपी, सोंगे इत्यादी लोककला प्रकार मराठवाड्यातील प्रमुख लोककला प्रकार आहेत. ग्रामीण नाटकात ग्रामीण जीवनाचे चित्रण करताना लोककला हा रंगभूमीचा फॉर्म अधिक जवळचा असल्याने लोकनाट्य अंगाने अनेक लेखकांनी नाटके लिहिली आहेत. प्रा.चंद्रकांत भालेराव यांनीही वगनाट्य लिहिली आहेत. इश्काच्या पायी बुडाले, हे त्यांचे एक उत्कृष्ट वगनाट्य .गणेश स्तवन करणारा गण न वापरता त्यांनी जनगणनायक अर्थात रसिकांनाच नमन केले आहे. चंद्रसूर्याचा वग अर्थात काळ्या दगडावरची रेघ ,नाक दाबलं तोंड उघडलं अर्थात झालं गेलं विसरून जा, असे तमाशाच्या वगाप्रमाणे दोन दोन नाव असलेली वगनाट्य प्रा.भालेराव यांनी लिहिली आहेत.लोककलेचा मानबिंदू असणारे थोर संशोधक डॉ. प्रभाकर मांडे यांनी लोकरंगभूमीवर विपुल लेखन केले आहे. लोकनाट्य म्हणताच त्याचे नाव घेणे अपरिहार्य ठरते .ते म्हणजे हरहुन्नरी कलाकार लेखक शाहीर विश्वास साळुंखे .शाहीर साळुंखे यांनी भरपूर वगनाट्य लिहिली. त्याचबरोबर सामाजिक प्रश्नांवर, भ्रष्टाचार कसा होतो ,सामान्य माणसाची कशी लुबाडणूक होते हे दर्शवणारे अनेक प्रयोग केले. त्यांचे पैशाला अनेक वाटा, झगडा लोकनाट्य प्रचंड गाजली. राजकारण, समाजकारण अंधश्रद्धा असे अनेक विषय हाताळले. शाहीर साळुंके यांनी झगडा हे नाट्य दलित प्रश्नावर लिहून आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे. सगळ धाब्यावर बसवलं ,खाली डोकं वर पाय ,कॉलर ताठ बायका साठ अशी अनेक वगनाट्य शाहिरी विश्वास साळुंखे यांच्या नावावर आहेत . लोककलावंत, संशोधक ,अष्टपैलू व्यक्तीमत्व डॉ. रुस्तुम अचलखांब यांचे नाव लोकरंगभूमीवर कोरले गेले आहे ते त्यांनी सादर केलेल्या गाढवाचं लग्न, आंबेडकरी शाहिरीचे रंग, आणि रंगबाजी या कलाकृतींमुळे .बेबंद नगरी हे डॉ.देवदत्त म्हात्रे यांचे एक राजकीय विडंबन असलेले लोकनाट्य होय.गाढवानं वाचली गीता हे सूर्यकांत सराफ यांचे प्रसिद्ध लोकनाट्य आहे.टेम्भुर्णी येथील मूळचे असणारे आणि सध्या मुबंई लोककला अकादमीचे प्रमुख असणारे लोककलेचे संशोधक डॉ. गणेश चंदनशिवे लोककला सातासमुद्रापार पोचवत आहेत.गोंधळमहर्षी राजाराम कदम गोंधळी यांनी गोंधळाला प्रतिष्ठा मिळवून दिली.भारुडरत्न निरंजन भाकरे,खंजिरीवादक भारूडकार मीरा उमाप लोकप्रबोधन करीत आहेत.शाहीरमहर्षी अंबादास तावरे, शाहीर सुरेश जाधव,शाहीर प्रवीण जाधव, शाहीर अरविंद घोगरे,शिवकर्तनकार डॉ. गजानन महाराज व्हावळ लोकप्रबोधन करीत आहेत.लोककलेचे अभ्यासक डॉ. राजू सोनवणे,डॉ. ज्ञानेश्वर उंडनगावकर ,डॉ. गहिनीनाथ वळेकर, डॉ. शिवाजी वाघमारे,योगेश निकम चिकटगावकर,विकास एडके आदी मंडळी लोकरंगभूमीवर कार्यरत आहेत
  • भजन

देवाची स्तुतिपर काव्यरचना साग्रसंगीत म्हणून देवाला भजणे किंवा आळविणे याला भजन म्हणतात. हा योगसाधनेतील भक्तियोगाचा भाग आहे. पूर्वीच्या संतपरंपरेतील नामदेवएकनाथतुकारामचोखामेळा इत्यादी संतांनी अनेक भजने तयार केली आहेत. त्यांपैकी काही रचना भीमसेन जोशी आणि अन्य अनेक गायकांनी गाऊन अजरामरकेल्या आहेत.
स्थानिक स्तरावर संवादिनी(हार्मोनियम),मृदंगतबलाढोलकीटाळ, टाळ्या यांचा वापर करून देवळात देवासमोर बसून वा घरीच संघटितपणे भजन गायले जाते. पूर्वीच्या काळात, रिकामा वेळ सत्कारणी लागावा म्हणून किंवा बहुधा गुरुवारी भजन करण्याची पद्धत होती. दृकश्राव्य माध्यमामुळे व करमणुकीच्या इतर साधनांमुळे भजन ही संकल्पना हळूहळू लोप पावत आहे. मात्र अजूनही ग्रामीण महारापष्ट्रात ही परंपरा अनेक ठिकाणी सुरू आहे. वारकरी पद्धतीची भजने प्रसिद्ध आहेत.
शहरांमधूनही निरनिराळी भजनी मंडळे अतिशय सुरेख असे भजनांचे कार्यक्रम करत असतात. काही भजनांमध्ये लोक नाचतातही.
  • चक्री भजन एखादा अभंग भजन म्हणून गायल्यानंतर त्याच्या शेवटच्या अक्षरापासून लगेचच दुसरा अभंग म्हणण्यास सुरुवात करतात. याला चक्री भजन असे नाव आहे.
  • सोंगी भजन या प्रकारात देवभक्ताच्या संवादाचा उपयोग सोंगे घेऊन करण्याची पद्धत आहे म्हणून याला सोंगी भजन असे नाव आहे.
  • रिंगण भजन या प्रकारात तीन वेगवेगळी भजन मंडळे गोलाकार उभी राहून एकापाठोपाठ एक क्रमाने अभंग गातात व भजन करतात. यातून भजनाचेही रिंगण बनते म्हणून याला रिंगण भजन असे नाव आहे.
  • परदेशात चिन्मयानंद मिशन तसेच हरेकृष्ण संप्रदायाचे अनुयायी भजनांचे कार्यक्रम आयोजित करत असतात. भक्तियोगाची साधना म्हणून त्याला चांगला प्रतिसाद लाभलेला दिसून येतो.
  • कीर्तन

  • वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात, आणि हे करणार्‍या व्यक्तीला कीर्तनकार. भारतातल्या सर्व प्रदेशांत, सर्व भाषांत आणि सर्व संप्रदायांत कीर्तन हा प्रकार आढळतो.नवविधा भक्तीपैकी कीर्तन हा दुसरा प्रकार आहे.
    महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. येथे होणार्‍या कीर्तनांत *नारदीय* कीर्तन आणि *वारकरी*कीर्तनअसे दोन मुख्य प्रकार आहेत. नारद हा भारतातील आद्य कीर्तनकार आहे, असे मानले जाते.
  • कीर्तन हा शब्द संस्कृतात 'कॄत्‌’ या दहाव्या गणातल्या धातूपासून झाला आहे. या धातूचा अर्थ उच्चारणे, सांगणे असा होतो. कीर्तन ज्या स्थानावर उभे राहून करतात ते स्थान म्हणजे देवर्षी नारदांची (कीर्तनाची) गादी. या कीर्तनाच्या पद्धतींच्या अनेक व्याख्या आणि संकल्पना भरत महामुनींच्या नाट्यशास्त्रापासून केल्या गेल्या.
  • भारतवर्षात नारदमुनींनी कीर्तनाचा आरंभ केला. नारदमुनींनी ते महर्षी व्यासांस शिकवले, व्यास महर्षींनी शुकास शिकवले आणि पुढे त्याचा सर्वत्र प्रसार झाला, अशी कीर्तन परंपरा सांगितली जाते..[१]
    [१] वस्तुतः 'श्रीहरिकीर्तन' खेड्यापाड्यात पोहोचले आहे. सर्व लोकांना ईशभक्तीमध्ये रममाण करणे हा कीर्तनाचा उद्देश आहे. अनेक कीर्तनकारांनी त्यांच्या कीर्तनांनी शिवाजी महाराजांच्या काळात व ब्रिटिशांच्या काळात लोकजागृतीचे काम केले. [२] गोव्यात जीवन्मुक्त महाराजांनी पोर्तुगीजविरुद्ध कीर्तानातून क्रांती केली.
  • नारदीय कीर्तन अणि वैयासिक कीर्तन (महर्षी व्यासानी सुरू केलेले) असे २ कीर्तन प्रकार होते. एक संगीत/नाट्यमय अणि दुसरा गद्यात सांगितला जाणारा असे यातील फरक आहेत. गीतेत नवविधा भक्तीत कीर्तन ही एक भक्ती असल्याचे वर्णन आहे.नऊ प्रकारांपैकी कीर्तन ही एक भक्ती आहे.कीर्तनाचे गुण संकीर्तन,नामसंकीर्तन,कथा संकीर्तन असे विविध प्रकार आहेत.'कीर्त'या संस्कृृत शद्बावरुन कीर्तन हा शब्द आला आहे.(भगवतगीता) भगवंताचे अणि थोर विभूतींचे गुणगायन करणारा व पराक्रमाचे वर्णन करणारा हा प्राचीन कला प्रकार आहे. नंतरच्या काळात नारदीय कीर्तनातून वारकरीरामदासीराष्ट्रीय कीर्तन असे वेगळे संप्रदाय निर्माण झाले. पण सर्व भारतात कीर्तन, थोडा फार बाह्यरूपात बदल झाला तरी, त्याचा मूळ गाभा कायम राखून आहे. स्वातंत्र्य चळवळीतसुद्धा कीर्तनकारांनी समाजाच्या जागृतीचे उल्लेखनीय कार्य केलेले आहे. महाराजांनी मानधन घेवू नये.
    कीर्तन ही खरेतर मूलतः एक भक्ती आहे. श्रीमद्‌ भागवतात सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तींपैकी ही दुसरी भक्ती आहे. "श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्! अर्चनं वन्दनं दास्यं, सख्यं आत्मनिवेदनम!" अशा ९ भक्तींपैकी एक. कीर्तन हे पूर्वी प्रसार, प्रचार, लोकशिक्षण, आणि समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम होते. काळाच्या ओघात अणि प्रसार माध्यमांच्या प्रगतीमुळे आज कीर्तनाचे महत्त्व कमी झाले असेल तरी आजही धार्मिक उत्सव अणि नित्य उपक्रमांत अणि काही मंदिरांत नियम म्हणून १२ महिने कीर्तन होत असण्याचा प्रघात आहे.
    कीर्तनकार कथा सांगत असल्याने त्यांस कथेकरीबुवा असेही म्हणतात.
  • कीर्तनाची मुख्य दोन अंगे असतात.१. पूर्वरंग आणि २. उत्तररंग [३] नारदीय कीर्तनात मुख्य ५ भाग असतात. सुरुवातीस नमन, पूर्वरंग (तत्त्वज्ञान व आध्यात्मिक चर्चा) नंतर मध्यंतरात नामजप आणि भक्तिगीत. नंतर पूर्वरंगाला साजेसे एखादे कथानक, म्हणजे उत्तररंग किंवा आख्यान आणि शेवटी भैरवी गायन, देवाकडे मागणे आणि आरती असते. हे सर्व कीर्तनकार एकट्याने करीत असतो. फारतर त्याला तबला-पेटी वाजविणार्‍यांची साथ असते.
    संत साहित्य , संस्कृत-मराठी सुभाषिते, नामवंत कवींच्या अर्थपूर्ण कविता, आध्यात्मिक विषयावर निरूपण, थोडाफार पण दर्जेदार विनोद आणि भारतीय शास्त्रीय-सुगम संगीत गायन, काही वेळा नर्तन आणि विषयविवरण यांनी सजविलेला एकपात्री भक्तीचा अविष्कार म्हणजे नारदीय कीर्तन. इंग्रजी, हिंदी आणि उर्दू काव्यातील उद्‌धृते, या गोष्टीसुद्धा विषयाचे विवरण करण्यासाठी योग्य संदर्भात वापरात येतात. असे नारदीय कीर्तन हे बहुरंगी आणि सर्व-समावेशक आहे. विविध चालीची पदे, श्लोक, आर्या, दिंडी, साकी, ओवी, याशिवाय पोवाडा, फटका, कटाव, आणि मराठी काव्य प्रकारातील इतर अनेक दुर्मिळ वृत्ते कीर्तनात गायली जातात . इतकेच नव्हे तर या कीर्तनातूनच मराठी संगीत नाटक मंडळीनी आणि जुन्या चित्रपटांनी अनेक सुमधुर लोकप्रिय चाली मिळवल्या.इष्ट देवतेची प्रार्थना किंवा तिचे गुणवर्णन हा कीर्तनांचा विषय असून भक्तिरसाचा परिपोष करणे, हे त्यांचे उद्दिष्ट असते. स्वररचनेपेक्षा येथे गीतरचना महत्त्वाची असते. साहजिकच कीर्तनातील स्वररचना आणि तालयोजना बहुधा साधीच असून सामान्य गायकांनाही ती पेलता येते. पंधराव्या आणि सोळाव्या शतकांत होऊन गेलेल्या ताळ्ळपाक्कम् संगीतकारांनी रचिलेली सु. वीस हजार कीर्तने सु. तीन हजार ताम्रपटांद्वारे उपलब्ध झालेली आहेत. प्रत्येक गीताबरोबर ते कोणत्या रागात गायिले जावे, हेही सूचित केले आहे. त्यांतील अनेक राग आज फक्त नावांनीच परिचित आहेत. उदा., आबाली व कोंडा मलहाहरी, शंकराभरण, श्रीराग, ललित इ. आज प्रचलित असलेल्या रागांतही ताळ्ळपाक्कम् संगीतकारांनी कीर्तनरचना केलेली दिसते. ⇨ पल्लवी ,  ⇨ अनुपल्लवी आणि ⇨ चरण असे एका गीताचे तीन भाग ह्या कीर्तनांतून प्रथमच प्रचारात आले. ‘दिव्यनाम कीर्तन’ हा कीर्तनांचा एक विशेष प्रकार. त्यांत फक्त पल्लवी आणि चरण हे दोन गीतभाग आढळतात. चरणसंख्या बरीच असून सर्व चरण एकाच चालीत गायिले जातात,  किंबहुना कधीकधी पल्लवी आणि चरण ह्यांचीही चाल एकच असते. ⇨ त्यागराज, विजय गोपाळ आणि भद्राचलम् रामदास ह्यांनी अशा प्रकारची कीर्तने रचिली
    आहेत. ‘उत्सव संप्रदाय कीर्तन’, ‘मानसपूजा कीर्तन’ आणि ‘संक्षेप रामायण कीर्तन’ हे कीर्तनाचे आणखी काही प्रकार होत. अनेक कीर्तने संस्कृतमध्ये रचिली गेली असली, तरी तेलगू भाषेतील कीर्तनांचे प्रमाण अधिक आहे. 
  • वारकरी कीर्तनात पूर्वरंग आणि आख्यान असे दोन वेगळे विभाग नसतात. संतांच्या अभंगाचे गायन आणि त्यावर निरूपण अश्या पद्धतीचे आणि टाळ मृदुंगाच्या घोषात २०-२५ साथीदारांसोबत वारकरी कीर्तन सादर केले जाते. वारकरी कीर्तनाची परंपरा खूप पुरातन आहे. मंदिरात सादर होणारे हे कीर्तन संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी चंद्रभागेच्या काठावर आणून जनसामान्यांना खुले करून एक नवी परंपरा सुरू केली. वारकरी कीर्तन हे आळंदी येथे वारकरी महाविद्यालयात शिकविले जाते.या माधमातून संतानी भक्तीमार्ग शिकविला.[२]
        संत नामदेवांनी वारकरी कीर्तन संस्थेचा पाया घातला.वारकरी कीर्तन ही सांस्कृृतिक लोकशाहीची पायाभरणी ठरली.
    
    "नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग।जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग ॥" (सकलसंतगाथा)
  • रामदासी कीर्तन परंपरा ही समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केली. रामदासी कीर्तन हे समर्थांच्या रचनांवर मुख्यतः आधारीत असते. आख्याने सुद्धा रामकथा आणि रामभक्ती यावरच मुख्यतः आधारीत असतात. श्रीधरस्वामी, केशवस्वामी , रंगनाथ स्वामी अश्या रामदासी परंपरेतील संतांच्या रचना आणि पदे यांचाही समावेश केला जातो. रामदासी कीर्तन हे आजही परंपरागत गुरुकुल पद्धतीनेच शिकविले जाते.
  • १) संयुक्त कीर्तन २) जुगलबंदी कीर्तन आणि ३) राष्ट्रीय कीर्तन.
  • पदांबद्दल इतर सर्वसाधारण विश्वकोशीय माहिती या विभागात लिहावी. ज्या कीर्तनकारांच्या मृत्यूस ६१ पेक्षा अधिक वर्षे झाली असतील अशा कीर्तनकारांची पदे जशीच्या तशी विकिस्रोत या बंधुप्रकल्पात जतन करता येतील. निरूपण/कीर्तन कसे करावे याबद्दल माहिती विकिबुक्स या बंधुप्रकल्पात लिहावी.
  • पुढे कीर्तनाला संगीताची साथ लाभली. टाळमृदंगएकतारी ही वाद्ये साथीला घेत. हल्ली पेटी तबला तर कधी बासरी अशी वाद्ये वापरली जातात
  • तबला पेटी / ऑर्गन (ही पारंपरिक वाद्ये). हल्ली काही कीर्तनकार व्हायोलिनची साथ घेतात चिपळ्या झांज करताल - हे एक वैशिष्टपूर्ण पारंपरिक वाद्य चार लाकडी पट्ट्यांच्या आधारे वाजवले जाते. महाराष्ट्रात काणे बुवा हे बुजुर्ग कीर्तनकार हे वाद्य वाजवितात
  • सर्व भारतीय भाषात होणारे कीर्तन हे हरिकीर्तन, हरिकथा या नावानेही ओळखले जाते.
  • मध्यंतरीच्या काळात मंदिरात होणारे कीर्तन वाळवंटात प्रथमच आणले ते संत नामदेवांनीसंत ज्ञानेश्वरसंत एकनाथसंत तुकारामसमर्थ रामदास हेही कीर्तन करीत. संत साहित्यामुळे कीर्तन समृद्ध झाले. आजही कीर्तनाला संत साहित्याचा भक्कम आधार असतो.
  • बंडातात्या कराडकर (कराडचे), संत गाडगे बाबासंत तुकडोजी महाराजमामासाहेब दांडेकरनिजामपूरकरभगवानबाबा,बाबामहाराज सातारकरनिवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकरनारायणबुवा काणेबालकीर्तनकार,किरण महाराज असवले-पाटील(जुळेवाडी,ता.पाटण जि. सातारा ) असे अनेक नामवंत कीर्तनकार महाराष्ट्रात होऊन गेले आहेत, किंवा अजूनही कार्यरत आहेत.
    अन्नमाचार्य, पेद्द तिरूमलयंगार, चिन्मय (हे सर्व ताळ्ळपाक्कम रचनाकार), पुरंदरदास, भद्राचलम् रामदास, नारायण तीर्थ, गिरिराज कवी, विजय गोपाळ स्वामी, त्यागराज, गोपाळकृष्ण भारती, अरुणाचल कविरायर, रामलिंगस्वामी हे काही श्रेष्ठ कीर्तनकार होत.
    • इ.स. १९२६ साली "कीर्तनचार्याकम्‌" नावाचे छोटे पुस्तक काशी येथून ह.भ.प.(हरिभक्तिपरायण विनायक गणेश भागवत यांनी प्रसिद्ध केले.
    • "कीर्तन सुधा धारा" नावाचे ३ खंडांत केलेले लेखन
    • "कीर्तन सुमनहार"
    • इ.स. १९८२ मध्ये ह.भ.प. गंगाधरबुवा कोपरकर यांनी लिहिलेले "कीर्तनाची प्रयोग प्रक्रिया' नावाचे उत्तम पुस्तक लिहिले. आज तरी त्याच्या इतके परिपूर्ण पुस्तक उपलब्ध नाही. आता अनेक लेखकांनी आणि संस्थांनी अनेक पाठ्यपुस्तके तयार केली आहेत.
    • अलीकडच्या काळात कीर्तनभूषण श्री प्रकाशबुवा मुळे गोंदीकर यांनी 'कीर्तन रहस्य 'नावाचा सर्व कीर्तन परंपरांचा अभ्यास करून संशोधनात्मक ग्रंथ लिहून प्रकाशित केला आहे
    • कीर्तनतरंगिणी (किमान तीन भाग, पहिल्या तीन भागांचे लेखक अनुक्रमे - पांडुरंग मोघे, भालचंद्र शंकरशास्त्री देवस्थळी, एम. पुराणिक)
    • कीर्तनमालिका (ज्ञानेश्वर म. इंगळे).
    • महाराष्ट्रात प्रथम वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना आळंदी येथे झाली.वै.मारुतीबोवा ठोंबरेंनी या संस्थेची मुहुर्तमेढ रोवली.त्यानंतर सुमारे दोन वर्षांनी त्यांनी ही जबाबदारी वै.जोग महाराजांकडे सोपविली.जोग महाराजांनी अथक परिश्रम करुन ही संस्था ऊभी केली.
      • महाराष्ट्रात दादर, मुंबई येथे सन १९४० मधे ’अखिल भारतीय कीर्तन संस्था’ या संस्थेची स्थापना झाली [४]. आजही ही संस्था कार्यरत आहे, अणि कीर्तन प्रवचन या जुन्या भक्तियुक्त कलाप्रकारांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. संस्थेचे कार्यालय द.ल. वैद्य मार्ग, दादर (प), मुंबई २८ येथे आहे.
      • पुणे येथे "नारद मंदिर" नावाची संस्था सदाशिव पेठेत हेच काम करते.
      • नागपूर येथेही कीर्तन महाविद्यालय आहे.
      • सांगलीला १९९२साली स्थापन झालेली अखिल भारतीय कीर्तनकुल नावाची संस्था आहे. तिच्या २०-२५ शाखा आहेत. संस्थेची पिंपरी-चिंचवड येथेही शाखा आहे.
      • चिंचवड येथील श्रीहरी कीर्तनोत्तेजक सभा कीर्तनाचे वर्ग घेते आणि परीक्षाही. (संस्थाप्रमुख दीपक रास्ते).
      • याशिवाय पंढरपूर, धरणगाव, धुळे, निकुंभे येथे कीर्तनाचे प्रशिक्षण देणार्‍या संस्था आहेत.
      वारकरी पद्धतीचे कीर्तन शिकविणारी व विष्णुबुवा जोग यांनी स्थापन केलेली संस्था -वारकरी शिक्षण संस्था महाविद्यालय- आळंदीला आहे.
    • खानदेशात कीर्तनकारांची एक फळीच निर्माण झाली आहे. वारकरी संप्रदायाचा प्रचार करताना, प्रसारासोबत व्यसनमुक्‍तीचे ते धडे देतात. टीव्ही चॅनेल, मोबाईलच्या जमान्यात अनेकजण कीर्तनापासून दूर जात असतानाही खानदेशात कीर्तनकारांची संख्या वाढत आहे. खानदेशात धरणगाव, धुळे, निकुंभे येथे कीर्तनाचे प्रशिक्षण देणार्‍या संस्था आहेत

भारूड

भारूड हा एक मराठी पद्यवाङ्मयाचा प्रकार आहे. याद्वारे साध्या रूपकांमधून धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. अनेक संतांनी समाजप्रबोधनपर भारुडे लिहिली आहेत. ज्ञानेश्वर आणि नामदेव या एकनाथपूर्व तसेच तुकाराम, रामदास या एकनाथांनंतर झालेल्या संतांनी भारुडे लिहिली, पण एकनाथ महाराजांसारखी विविधता त्यांत नाही. संत तुकडोजी महाराजांच्या रचनादेखील प्रचलित आहेत.
भारूड‘ या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ ‘धनगर‘ असा आहे. त्याच्या स्पष्टीकरणासाठी महानुभाव पंथाच्या ऋद्धपुर वर्णन या ग्रंथाचा आधार घेऊन ‘रातप्रभेचे नि घोडे, मेंढिया श्रृंगारती भारुडे‘ असे म्हटले आहे. महाभारतात शकुंतला आख्यान, भारूड सांग हा गीतप्रकार होता. म्हणजेच अथर्वशीर्षांच्या रचनेचा काळ हा सुमारे २५०० वर्षांपूर्वीचा होता. त्यावरून ‘भारूड‘ हा शब्द किमान २००० वर्षे इतका प्राचीन असण्याची शक्यता आहे. वेदकाळी व वेदोत्तरकाळी येते प्रसंगी प्राकृत लोकांचे जानपदाचे, करमणुकीचे प्रकार होत. त्यांतून वैदिक देव व त्यांच्या शौर्यप्रसंगांची स्तुती गायली जायची. याज्ञिक लोकांनंतर यज्ञांची जागा देवपूजेने तर संस्कृत भाषेची जागा प्राकृत भाषेने घेतली, तेव्हा कालमानानुसार पालटते रूप घेऊन जानपद वाङ्मय भारूड स्वरूपात आले असावे. भारुडाचे उगमस्थान म्हणजे हरिकीर्तन आणि कीर्तन परंपरेचे जनक म्हणजे नामदेव महाराज. नामदेव नाचून जे कीर्तन करायचे त्याला लळित म्हणतात आणि लळितातून रूपकाचा जन्म झाला. अध्यात्म सांगायचे ते एखाद्या गोष्टीमधून किंवा रूपकाच्या माध्यमातून. भारुडाचा प्रधान हेतु हाच होता.

'बहुरूढ' या शब्दाचा अपभ्रंश 'भारूड' झाला असेही काहींचे मत आहे
एकनाथांच्या भारुडांतून त्यांचा आध्यात्मिक अनुभव अगदी सोप्या भाषेत मांडला गेला आहे. सदाचार आणि नीती यावर त्यांचा मोठा भर होता. त्यामुळे समाजाला कळणारी भाषा व पेलणारे तत्त्वज्ञान त्यांच्या भारुडांत आढळते. नाथांच्या भारुडांत विषयांची विविधता खूप आहे. साऱ्या जीवनाचे अवलोकन आणि चिंतन या भारुडांमधून व्यक्त झाले आहे. भारुडांच्या रचनेत अध्यात्म, मनोरंजन, दोष-दुर्गुणांचे भंजन तसेच गूढगुंजन आहे. भारूड लिहिण्याच्या प्रयोजनांवरून व रचना संकेतांवरून एकनाथांची भारूडे ही आध्यात्मिक उद्बोधन, प्रबोधन व लोकरंजन साधण्यासाठी केलेली रूपकात्मक स्फुट रचना होय. म्हणूनच संस्कृत वाङ्मयात जे स्थान पुराणांचे आहे तेच संत वाङ्मयात भारुडांचे आहे. भारूडरचनांमध्ये नाट्यतत्त्वे ठासून भरलेली असतात. त्यामुळे त्यांचे नाट्यरूपांतर सहजतेने होते.
भारूड हा प्रबोधनासाठी उपयुक्त असा काव्यप्रकार असल्याने बऱ्याच संप्रदायांनी त्याचा उपयोग करून घेतला आहे. संस्कृत किंवा प्राकृत भाषेत भारूड हा शब्द भारूड या गीत प्रकाराला उद्देशून जरी असला तरी या भाषांमध्ये भारूड रचना उपलब्ध नाही. त्यामुळे भारूड या काव्यरचनेचा उगम हा मराठी भाषेतच झाला. संत ज्ञानेश्वर हेच भारुडाचे आद्यरचनाकार असावेत असा एक प्रवाह मानतो. मात्र त्या आधीही भारुडे प्रचलित होती. संत एकनाथ महाराजांनी भारूड या काव्यरचनेला शिखरावर नेऊन पोहोचविले.
भारूडातील विषय हे सर्वसामान्यांच्या परिचयाचे व नित्याच्या व्यवहारात वावरणारे व आढळणारे असतात. व्यवसाय, नाती-गोती, सामाजिक वृत्तिदर्शन, गाव, दैवी भूमिका, भूत-पिशाच्च, पशु-पक्षी, सण आदि बाबी असे विविध विषय एकनाथांच्या भारुडांत दिसून येतात.
भारुडाचे साधारणपणे भजनी भारूडसोंगी भारूड आणि कूट भारूड असे तीन प्रकार मानले जातात. पैकी भजनी भारूड हे कीर्तनासारखे. कूट भारूड म्हणजे ज्याचा अर्थ लावावा लागतो, जसे 'चिंचेच्या पानी एक देवालय उभारिले, आधी कळस मग पाया रे' किंवा 'मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती...'सारख्या कूट रचना होत.
एकनाथमहाराजांनी ४५० वर्षांपूर्वी ‘एडका’ या भारुडाची रचना केली होती. एकनाथांची अशी रूपके सध्याचे एचआयव्ही/एड्ससारखे आजार रोखण्यासाठी तंतोतंत लागू पडतात. म्हणूनच राज्याच्या एड्स नियंत्रण संस्थेद्वारे आज लोककलेच्या माध्यमातून लोकजागृती करण्यासाठी भारुडांचा उपयोग केला जातो.
लोकशिक्षणासाठी संतांनी भारुडांची रचना केली. भारूड हे नुसते गायनाने दाखवायचे नसते तर त्याचे संपादनही करावे लागते. भारुडांत ब्रह्म ज्ञानाला गोष्टीचे रूप देऊन मनोरंजन करावे लागते. तसेच भारूड म्हणणारी व्यक्ती ही अध्यायाबरोबरच नटही असावी लागते. या दोन्ही गोष्टींची सांगड घातली गेल्यामुळेच भारुडांनी जनमनोरंजनाची साधने म्हणून शतकानुशतके लोक शिक्षणाचे व स्वधर्म जागृतीचे कार्य केले आहे. हीच भारुडे लळितात अभिनय करून संभाषणे टाकून म्हटली जातात आणि म्हणूनच लळिताचे बीज भारुडात आहे असे म्हटले जाते. मराठी संतांनी प्रौढ, सुशिक्षित जनांसाठी भागवतज्ञानेश्वरी, गाथा, अमृतानुभव अशा प्रकारच्या ग्रंथांची निर्मिती केली. तसेच इतर सर्वजनांनाही परमार्थाचा आनंद घेता यावा व अध्यात्म सुलभ व्हावा म्हणून भारुडांची व्यवस्था केली. हा एक वारकरी कला आविष्कार आहे.
पूर्वी भारूड फक्त पुरुष सादर करीत असत. परंतु ही परिस्थिती आता बदलली आहे. संत साहित्याच्या अभ्यासक गंगूबाई जाधव, लक्ष्मीबाई गिराम आणि चंदाबाई तिवाडी या स्त्री-भारुडकर्त्या भारुडे सादर करीत असतात. चंदाबाई तिवाडी यांना तर संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. आकाशवाणीवर आणि दूरचित्रवाणीवर कार्यक्रम करण्यास त्यांना आमंत्रित केले जाते. महाराष्ट्रात निरंजन भाकरे, चंदाबाई तिवाडी आणि मीराबाई उमप हे भारूड सादरर्कते आहेत. स्वातंंत्र्यपूर्व काळात जुन्नर तालुक्यातील राधाबाई आरोटे व सीताबाई आरोटे (डुंंबरवाडी) यांंनी महाराष्ट्रभर वारकरी भारुडे सादर केली. पुरुषवेष धारण करुन या दोघी बहिणींंनी मुंंबईसह महाराष्ट्र गाजविला. मुंबईमध्ये त्यांच्या भारुडासाठी अलोट गर्दी व्हायची.
वामन केंद्रे यांनी दरवाडी येथे इ.स. २०११ मध्ये भारूड महोत्सव आयोजित केला होता. संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी भारुडाची कला जिवंत ठेवली आहे त्यांनी १४ मे २०१६ पर्यंत ‘बहुरूपी भारूड’चे २१०० प्रयोग केले आहेत.

गोंधळ

महाराष्ट्रात गोंधळी लोक गोंधळ हे पारंपरिक/ विधिनाट्य सादर करतात. या जातीचे लोक महाराष्‍ट्रकर्नाटकमध्‍यप्रदेश आणि आंध्रप्रदेश या प्रांतात विशेषेकरून आढळतात. गोंधळ्यांनी आपल्‍या विधिनाट्याची एक स्‍वतंत्र रंगभूमी विकसित केली असून आपल्‍या या रंगभूमीवरील रंगाविष्‍काराला संस्‍थात्‍मक स्‍वरूप प्राप्‍त करून दिले आहे.
गोंधळी हे देवीचे उपासक असून ते गोंधळ या विधिनाट्याद्वारे मंगल कार्याची सांगता करतात. महाराष्‍ट्रात गोंधळ्यांच्‍या मराठे‚ कुंभार, कदमराई व रेणूराई अशा पोटजाती असल्‍याचे उल्‍लेख असले तरी गोंधळ्यांनी रेणुराई आणि कदमराई अशाच आपल्‍या पोटजाती असल्‍याचे सांगितले. यांनाच रेणूराव व कदमराव असेही म्‍हणतात. रेणुराई हे माहूरच्‍या रेणुकेचे भक्त असून ते रेणुकेचीच उपासना करतात. तर कदमराई हे तुळजापूरच्‍या भवानीचे भक्त असून तिचीच पूजा मांडतात. गोंधळाचे विधिनाट्य सादर करण्‍यालाच गोंधळ घालणे अशी संज्ञा आहे.
लग्‍नासारख्‍या विधीत गोंधळाच्‍या कुळाचारास अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. गोंधळ या विधिनाट्यात गोंधळी महिलांचा सहभाग कधीही नसतो. त्‍यांना देवीची गाणी मात्र येत असतात. आजचे गोंधळाचे जे प्रचलित स्‍वरूप आहे त्‍यात गोंधळ्यांची संख्‍या चार किंवा आठ असते. त्‍यातील एक प्रमुख गोंधळी असतो, बाकी त्‍याचे साथीदार असतात. वाद्यांमध्‍ये तुणतुणे आणि संबळ ही प्रमुख वाद्ये आहेत. तर कधी गोंधळी हाच वादकाची भूमिका बजावत असतो. आणि एखादा साथीदार दुसऱ्या वाद्यासह साथ करतो. आज रूढ असलेल्‍या गोंधळाच्‍या प्रकारात काकड्या गोंधळ व संबळ्या गोंधळ असे दोन प्रकार आढळतात. काकड्या गोंधळ हे कोणत्‍याही जातीचे लोक करू शकतात, तर संबळ्या गोंधळ हा गोंधळी जातीचे लोकच घालतात. गोंधळ करण्‍याच्‍या पद्धतीत दोन्‍ही उपजातींच्‍या पोषाखामुळे आणि परंपरेने चालत आलेल्‍या संकेतांमुळे काही भेद निर्माण झाले आहेत. उदा. रेणुराई गोंधळी विधिनाट्याच्‍या वेळी समोर दिवटी ठेवतो. कदमराई गोंधळी हातात जळता पोत घेऊन गाणी म्‍हणतात. ते एका हाताने संबळ वाजवतात. कदमराई गोंधळ्यांनाच भुत्‍ये‚ राजदरबारी गोंधळी असे म्‍हणतात. गोंधळी हा गोंधळ विधी सादर करताना परंपरेने चालत आलेल्‍या सांकेतिक करपल्‍लवीने प्रेक्षकांना चकित करतात. करपल्‍लवीच्‍या वापराने त्‍यांचे सादरीकरण न केवळ चमत्‍कृतीपूर्ण होते तर नाट्यपूर्ण व रंजकही होते. परशुरामाने गोंधळ्याची निर्मिती कशी केली हे जसे ते कवनांमधून सांगतात त्‍याचप्रमाणे उदरनिर्वाहाची तरतूद भवानी मातेने आशीर्वाद दिल्‍यामुळे कशी झाली यासंबंधीची कथाही त्‍यांच्‍या कवनांतून गातात.
गोंधळातील गीत समारंभात देवीची स्तुतिगीते असतात. कृष्णकथा गुंफणाऱ्या गौळणी असतात. वीरांचे पराक्रम गाणारे पोवाडे असतात. आध्यात्मिक भेदिक रचना असतात. ग्रामीण जीवनातील वास्तवावर उपरोधिक भाषेत प्रकाश चाकणारी गीते असतात, तर कीर्तनकारांच्या उत्तररंगात रंगणारी आख्यानगीतेही असतात. गोंधळाच्या उत्तररंगात आख्यान लावले जाते. त्यात अंबरीष राजा, विक्रम राजा, जांभुळ आख्यान, चांगुना आख्यान यांसारखी आख्याने, निरुपण, निवेदन, विनोदी बतावणी, गमतीशीर संवाद यांसह गोंधळी रंगवून रंगवून सांगतो. [१]
थोडक्यात, महाराष्‍ट्रातील लोकसंगीतात गोंधळ या प्रयोगरूप लोककलेचे स्‍थान महत्त्वाचे आहे. गोंधळी ही देवीच्‍या भक्‍तांची भटकी जात आहे. गोंधळ हा लग्‍न, मुंज, बारसे, जावळ, अशा समारंभाचे वेळी देव – देवतांच्‍या उपासनेसाठी केलेला एक कुलाचार आहे.

मानवी वाघ

ही लोककला विदर्भात व विशेषतः नागपूर परिसरात प्रसिद्ध आहे. सन १९७२-१९७४ पर्यंत ही पहावयास मिळ्त होती. ती आता लोप पावत आहे. मानवी शरीरावर जंगलातल्या वाघासारखी रंग रंगोटी करून, डोक्यात केसाळ टोप घालून व वाघासारखे कान व शेपटी लावून वाद्याच्या तालावर मानवी वाघ नाचत असे. हा एक प्रकारचा बहुरुप्याचाच खेळ असे. या वेळेस, सनई (शहनाई) व ढोल, ताशे इत्यादी त्याचे सोबत असे. सनईच्या गोंडी तालावर मग हा वाघ डरकाळी फोडत व नाचत असे. लहान मुलांना भिवविण्यासाठी व त्यांची गम्मत करावयास त्यांचे अंगावर धावून जात असे. विशिष्ट ताल ऐकला की लहान मुले, बायाबापड्या वाघ बघावयास घराबाहेर येत असत व गोल उभे रहात. त्यामध्ये मानवी वाघ नाचत असे.
पोळागणपतीमस्कऱ्या गणपती, देवी, मारबतमोहरम या सणांमध्ये विसर्जन सोहोळ्यात मानवी वाघ असेच. दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी नाचण्यासाठी मानवी वाघास खूपच दमदार असणे आवश्यक असे. त्यामुळे बहुधा पहेलवान लोकच वाघ बनत. आयुष्यभरात, २५-३० वेळा वाघ बनलेले लोक हयात आहेत. वाघ ओळखीच्या घरासमोर पण जाऊन नाचत असे. मग घरमालकाने दिलेली चलनाची नोट तोंडात घेऊन मग परत जाई.
नागपूर येथील राजे रघुजीच्या काळात, राजवाड्यावर होणाऱ्या प्रत्येक उत्सवाचे वेळी मानवी वाघाचा नाच होत असे.
या मानवी वाघाची रंगरंगोटी करणे हीसुद्धा एक कला आहे. या रंगकामात, पट्टेदार वाघ, ढोऱ्या वाघ, झेंडू वाघ, बिट्टु वाघ आदी समाविष्ट आहेत. नागपूर येथील चितार ओळीत, वाघ चितारणारे पेंटर होते व आहेत.
यामध्ये शरीरावर रंग लावला जात असल्यामुळे, शरीराची आग होत असते. शरीराची चामडी रंगामुळे ताणली जाते. नंतर, लावलेला रंग ८-१० दिवस निघत नाही. तो घासून काढावा लागतो. त्यानेही शरीराची आग होते. या सर्व त्रासांमुळे आधुनिक पिढी, हा वारसा चालवायला तयार नाही. कारण गोंडी तालाऐवजी ते डी.जे.च पसंत करतात.

वासुदेव

वासुदेव हे मराठी, भारतीय संस्कृतीतील एक पुल्लिंगी नाव आहे. हे नाव सहसा एखाद्या व्यक्तीचे पहिले नाव असते. याशिवाय वासुदेव या नावाने ओळखला जाणारा भिक्षुक लोककलाकारांचा प्रकारविशेषही महाराष्ट्रात व नजीकच्या भूप्रदेशांत आढळतो.
==वासुदेवाची गाणी==
अवो जनाबाईंच्या भक्ती –देव गुंतला जनामातेला काम भारी घालिते दळण जात्यांवरी विट्ठला या हो लौकरी
यावे यावे जगजेठी तुमच्या नावाची आवड मोठी खुटीला घालून मिठी
दोन बोलू सुखाच्या गोष्टी अवो जनाबाईंच्या भक्ती – देव गुंतला 
पुणे येथे वासुदेव चित्र:वासुदेव.jpg|इवलेसे|लोककलाकार वासुदेव
वासुदेवाची बोली ही लोकसाहित्य संस्कृतीमध्ये महत्त्वाची मानली जाते. या बोलीमुळे लोकसाहित्य आजही जिवंत आहे.

दिवाळीची गाणी

दिवाळी या मराठी संस्कृतीतील महत्त्वाच्या व आनंदी सणामध्ये पाच दिवस वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत. यामध्ये नात्यांना विशेष महत्त्व आहे त्यामुळे सार्वजन या सणाच्या निमित्ताने एकत्र जमले जातात. या सणाच्या अंड वाढविण्यासाठी विविध पारंपारिक गाणी किंवा रचना आहेत. यामध्ये विशेषता: बहिण भावाच्या नात्यासाठी
आली आली दिवाळी... बहिण भावाला ओवाळी ..! आशा रचाना प्रचलित आहेत